पालघर जिल्ह्यात कुपोषण ही गंभीर समस्या आहे. हा एक चिंतेचा विषय आहे. येत्या पाच वर्षात पालघर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील सेंट मेरी हायस्कूलमध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ निमित्त आयोजित महाशिबिराचे उद्घाटन राज्यपालांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल बैस म्हणाले की, देशाची विकासाकडे वाटचाल सुरु असून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाच्या सुविधा पोहोचत नाहीत, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. देशात आणि राज्यात राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच आरक्षण हे कोणत्याही एका समाजासाठी नसून ते संपूर्ण देशासाठी आहे, देशाच्या विकासासाठी आदिवासी समाजाचा विकास आवश्यक आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील तसेच पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते.