बोईसर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचा अंतिम सामना बघताना झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला.

बोईसर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचा अंतिम सामना बघताना झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला. दोन व्यक्तींनी केलेल्या बेदम मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत होऊन या तरुणाचा रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहेत.

१९ नोव्हेंबर रोजी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि औस्ट्रेलिया दरम्यान अंतीम सामना सुरू असताना बोईसरमधील चित्रालय परीसरातील संतोष हेयर सलून या दुकानात मयत प्रवीण राठोड (३७) आणि आरोपी मनोज गिरी आणि प्रतीक गिरी हे केस कापण्यासाठी आले होते. या दरम्यान मोबाईलवर क्रिकेट सामना बघत असताना दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी आपल्या इतर मित्रांना बोलावून घेऊन मयत प्रवीण राठोड याला जोरदार मारहाण केली. त्यानंतर सलूनमधील खुर्चीचा हेडरेस्ट काढून त्याने प्रवीण राठोड याच्या डोक्यावर प्रहार केले. या बेदम मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रवीण राठोड याला प्रथम तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र त्याची स्थिती अधिक गंभीर असल्याने त्याला मीरा रोड येथील तुंगा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र २३ नोव्हेंबर रोजी प्रवीण राठोड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 याप्रकरणी मृताच्या नातेवाईकाने बोईसर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी मनोज गिरी, प्रतीक गिरी आणि आणखी दोन अनोळखी इसमांविरोधात कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहेत. पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गवई हे अधिक तपास करीत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Previous Post Next Post