पालघर। उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या महिलांवर तप्त डांबर पडून दहा महीला भाजून जखमी झाल्याची घटना वाणगाव येथे घडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथील फटकाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कंत्राटदाराकडून पृष्ठभागावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास उड्डाणपुलावर डांबर टाकण्याचे काम सुरू असताना तप्त डांबर उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या महिलांवर पडल्याने त्यांच्या शरीराची त्वचा भाजून दहा महीला जखमी झाल्या. जखमी महिलांना वाणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.