पालघर दि. 30 : आपल्याला लाभलेले शौर्याचे स्मरण करून देणारे गड, कील्ले हे आपल्या देशाची अमुल्य संपत्ती असून या ऐतिहासीक वारसाला जपणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, येथे शिरगांव येथील शिरगाव किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरुस्ती कामाचे भूमिपूजन तसेच जव्हार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामांतरण दूरदृष्य प्रणालीद्वारे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, माजी खासदार राजेंद्र गावित, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शिरगाव येथिल किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे या भागामध्ये पर्यटनाला चालना मिळेल यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल या किल्ल्याच्या दुरुस्ती कामासाठी 6 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून इतर ऐतिहासीक वास्तूंचे टप्प्या टप्प्याने दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येतील असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
भगवान बिरसा मुंडा यांचे नाव जव्हार मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिले असून महाराष्ट्रातील 400 पेक्षा अधिक प्रशिक्षण संस्थेचे अशा प्रकारे नामांतरण करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
**********