पालघर तालुक्यातील कुंभवली गावात निर्माण केल्या गेलेल्या भव्य गणेश घाट उद्यानाचे लोकार्पण एनजीएल उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल नाचणे ,जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कुंभवली ग्रामपंचायत व कुंदन संखे यांच्या पाठपुराव्याने व एनजीएल उद्योगसमूहाच्या सीएसआर फंडातून कुंभवली येथे अतिशय भव्य व आगळेवेगळे असे गणेश घाट उद्यान उभारण्यात आले असून यामुळे गणेशोत्सवा दरम्यान विसर्जन करण्याकरता अतिशय योग्य अशी उपलब्धता परिसरात निर्माण झाली आहे तसेच एक स्वतंत्र अशी विधी कार्याची शेड बनविण्यात आली असून संपूर्ण गणेश घाटाला एका उद्यानाचे स्वरूप प्राप्त झाल्याने गावातील व परिसरातील नागरिकांना या उद्यानाचा उपयोग होणार आहे.
सदर उद्घाटन प्रसंगी राहुल नाचणे यांनी त्यांच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून दिलेल्या सीएसआर फंडाचा योग्य वापर करून एक चांगली वास्तू उभे केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले तर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या शाश्वत बाबींकरता एक मानसिक समाधान प्राप्त होईल अशी वास्तू उभारल्याबद्दल व गावाच्या एकूणच विकास कार्याबद्दल आनंद व्यक्त केला तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाकरता जिल्हा परिषद सदैव पाठीशी असेल अशी ग्वाही देत कुंभवली कार्याच्या गावाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासात्मक कार्याकरिता ग्रामपंचायतचे अभिनंदन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कुंदन संखे यांनी पालघर जिल्हा महाराष्ट्रा च मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून प्रगतीपथावर असून सर्वांनी दूरदृष्टीकोन ठेवून ध्येय ठरवणे गरजेचे असल्याचे व जिल्ह्यातील कुठल्याही विषयाकरता आपण खंबीरपणे सोबत राहणार असल्याचे सांगितले.
कुंभवली ग्रामपंचायत सरपंच तृप्ती संखे यांनी गावाची विकासात्मक वाटचाल अशीच पुढे चालू राहणार असून कुंभवली गावाला जिल्ह्यात आदर्श गाव बनवण्याकरता सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
कुंभवली गावातील गणेश घाटाच्या उद्घाटन प्रसंगी एनजीएल उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल नाचणे, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे,शिवसेना उपनेत्या ज्योती मेहेर ,शिवसेना जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, तालुक्याचे गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, कुंभवली गावच्या सरपंच ऍड तृप्ती संखे, उपसरपंच अमित संखे, ग्रामपंचायत सदस्य पंचक्रोशीतील सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.