पालघर जिल्ह्यात मुबंई वडोदर एक्सप्रेस वे च काम प्रगतीपथावर असून तलासरी मधील बोरमाळ, कोचाई येथे मागील दोन दिवसांपासून ठेकेदार कंपनी, भूसंपादन अधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मोबदला न देता घरे व जमीन ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. थंडीच्या हंगामातच प्रशासनाकडून घरे जमीनदोस्त केल्याने रात्रभर आदिवासीं कुटुंबाना लहान मुलांसह उघड्यावरच संसार करावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर आला आहे. तर काही बाधित शेतकऱ्यांना प्रांत अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी जमिनीचा मोबदला चेकद्वारे दिला. परंतु कोचाई गुरोड मधील परशुत बरफ यांची वडिलोपार्जित वहिवाटदार असलेली जागा ते कसत होते. परसूत बर्फ हे कामानिमित्त बोटीत गेले असताना त्यांच्या जमिनीचा मोबदला कुटुंबाकडे दिला गेला नसल्याने परशुत बर्फ यांची पत्नी लक्ष्मी बर्फ ही गेल्या दोन-तीन दिवसांमधून मानसिक तणावाखाली जगत होती. त्यांच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार जमिनीचा मोबदलाही दिला गेला नाही आणि जमिनी आमच्या ताब्यातून जाणार असे बोलत होती. गुरुवारी घरात कोणी नसताना तिने स्वतः ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून हा शासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत.