डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चळणी, सायवन, दाभाडी, किन्हवली या आश्रमशाळांना अन्नपुरवठा करणाऱ्या वाहनाचा अपघात बापू गावाजवळ झाला. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, एका भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने अन्नपुरवठा करणाऱ्या गाडीला धडक दिल्याने ती पलटी झाली.
अपघाताच्या वेळी वाहनात चळणी, सायवन, व दाभाडी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळच्या जेवणाचे डबे होते. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत अन्न रस्त्यावर विखुरले. परिणामी, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण मिळण्यात अडचण निर्माण झाली. या प्रसंगात तत्काळ दुसऱ्या वाहनाद्वारे अन्नपुरवठा केल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी दिली.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी शाळांमध्येच स्वयंपाक करून गरमागरम अन्न पुरवले जायचे. मात्र, सध्या खाजगी कंपनीमार्फत अन्न तयार करून 40-50 किलोमीटर अंतरावरून वाहून आणले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना थंड आणि शिळे अन्न मिळत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.पावसाळ्यात आणि अशा अपघातांच्या वेळी अन्नपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी शाळांमध्येच स्वयंपाकघर सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे. गरमागरम आणि ताजे अन्न मिळावे, यासाठी शाळांमध्ये भोजनालय सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
अपघाताचे मूळ कारण अवजड वाहतूक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने अपघातांचा धोका वाढत आहे. अपघाताच्या प्रकरणाचा तपास कासा पोलीस ठाणे करीत असून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.