पालघर: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(माफसु) नागपूर अंतर्गत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ मुंबईमधील पशुपोषण शास्त्र विभाग आणि पशुधन प्रक्षेत्र संकुल तसेच यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शास्त्रोक्त शेळीपालन प्रशिक्षण मौजे अणवीर तालुका तलासरी जिल्हा पालघर येथे दिनांक 6 ते 7 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत शास्त्रोक्त पशु आहार व्यवस्थापनाच्या माध्यमातून "महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या उपजीविकेच्या विकासासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठीच्या उपाययोजना" अंतर्गत पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील अणवीर गावात राबविण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी अणवीर गावातून 106 प्रशिक्षणार्थी यांनी शेळीपालन प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थिती नोंदविली आहे. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉ. धनंजय पवाळकर यांनी शेळ्यामधील महत्त्वाचे रोग आणि उपाय तसेच लसीकरण या महत्त्वाच्या विषयावर उपस्थित असलेले प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर तज्ज्ञ डॉ. व्ही. पवार यांनी शेळीपालनातील अर्थशास्त्र अत्यंत सोपे करून प्रशिक्षणार्थी यांना जास्त नफा कसा मिळवावा याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शेळीपालन उद्योगासाठी उपलब्ध असलेले माहितीस्रोत त्यांचा वापर कसा करावा व शेळीपालन उद्योग फायदेशीर करण्यासाठी काही सोप्या पद्धती तज्ज्ञ डॉ. मनीष सावंत यांनी सांगितल्या. या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सुरेश जगदाळे यांनी चाऱ्यापासून मुरघासाची निर्मिती आणि शेळ्यांसाठी विविध पोषणमूल्य यावर व्याख्यान दिले. डॉ. सुरेश जगदाळे यांनी व्याख्याना नंतर मूर घास कसे बनवावे यावर प्रात्यक्षिक करून दाखवले . प्रशिक्षणार्थी व गावातील इतर सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवून शेळीच्या खाद्याविषयी इतर शंका विचारून निराकरण केले. बचत गटातील महिलांना शेळीपालन व्यवसायातील विविध संधी यावर तज्ज्ञ डॉ. मयुरा गोळे यांनी मार्गदर्शन केले. अंतराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन देखील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ आणि प्रशिक्षणार्थी यांनी अत्यंत उत्साहात साजरा केला . "इन्स्पायर इंक्लुजन" म्हणजेच महिलांच्या समावेशास प्रेरणा देणे आणि सक्षमीकरण करणे, ही थीम डोळ्यासमोर ठेवून या थीमच्या अनुषंगाने महिलांच्या शेळीपालनामधील समावेशास प्रेरणा देणे आणि त्यांचे सक्षमीकरण कसे करण्यात येईल यावर प्रयत्न आणि मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणासोबतच अणवीर गावात पशुरोग निदान शिबिर, लसीकरण आणि जंत निर्मूलन कार्यक्रम देखील राबविण्यात आले. शेळीपालकांनी आपल्या जनावरांच्या विविध रोगांवर तज्ञामार्फत उपचार करून घेतले. प्रशिक्षण समाप्त झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी यांना मंचावर आमंत्रित करून मान्यवरांकडून प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप बचत गटातील महिलांनी तारपा नृत्याचे प्रदर्शन करून केले. हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी माफसु चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील,पशुवैद्यक व पशुविद्यान (अधिष्ठाता)डॉ.उपाध्ये,विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भीकाने आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. सरिता गुळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महाविद्यालय मुंबई येथील तज्ञ तसेच यशराज रिसर्च फाउंडेशन ची टीम यांनी विशेष प्रयत्न केले.