वाढवण बंदर भूमिपूजनासाठी पालघर येथील सिडको मैदानात ३० ऑगस्ट रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाच्या खर्चाची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे पाच महिन्यांपासून प्रलंबित ठेवली आहेत. ऐन पावसाळ्यात अगदी कमी दिवसात भूमिपूजन कार्यक्रमाची संपूर्ण तयारी करून देणाऱ्या ठेकेदारांची सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर चे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांच्याकडून पिळवणूक सुरू असल्याचा आरोप होत असून देयके काढण्यासाठी सचिन पाटील यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप काही ठेकेदारांनी केला आहे.
वाढवण बंदर भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३० ऑगस्ट रोजी पालघरच्या सिडको मैदानात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री उपस्थित होते. ऐन पावसाळ्यात भूमिपूजनाचा जाहीर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्याचे मोठे आव्हान जेएनपीए आणि जिल्हा प्रशासना समोर होते. पावसामुळे सिडको मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. जिल्हा प्रशासनाने सर्व ठेकेदारांना एकत्र करून मैदान सभायोग्य बनविण्यासाठी सर्वांना मदत करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांनी रात्रंदिवस एक करून अगदी कमी कालावधीत मैदान सभेसाठी तयार केले. त्याचबरोबर पोलीस परेड ग्राउंड येथे पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टर साठी चार हेलीपॅड, हेलिपॅड कडे जाणारा रस्ता ठेकेदारानी तयार करून दिला. या सर्व कामांसाठी जेएनपीएने जवळपास १६ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांना दिला होता. मात्र पाच महिन्यानंतर देखील यातील फक्त आठ कोटींची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांना अदा करण्यात आली असून उर्वरित देयके मिळावी यासाठी ठेकेदार पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. ठेकेदारांची प्रलंबित सर्व देयके काढण्यासाठी कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप काही ठेकेदारांनी खाजगीत बोलताना केला असून पंतप्रधानांच्या वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या खर्चाची सर्व देयके तात्काळ मिळण्याची मागणी केली असून ठेकेदाराची पिऊन करणाऱ्या पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे