वाणगाव येथील सेमिंडिया ( आयटीडीसी ) कंपनीकडून स्थानिकांना रोजगाराची दारे खुली

प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प अंतर्गत समुद्रात माती भरावाचे काम करणाऱ्या वाणगाव येथील सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड ( आयटीडीसी ) या कंपनीकडून स्थानिकांना रोजगाराचा नवा मार्ग खुला झाला आहे. स्थानिक युवकांना कौशल्याधारित रोजगार मिळावा, यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

याअंतर्गत वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेड आणि राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र यांच्यात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पीएम सेतू योजनेअंतर्गत स्थानिक तरुणांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत समुद्रात माती भरावाचे कंत्राट मिळालेल्या सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेषतः किनारपट्टीवरील बाधित गावांमधील सुशिक्षित बेरोजगार युवकांना वाणगाव येथील कार्यालयीन तसेच इतर विभागांमध्ये नोकऱ्या मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वाढवण बंदराचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, सेमिंडिया तसेच इतर संबंधित कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू होणार असून, बंदराशी निगडित विविध रोजगारांमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वाढवण बंदरात परप्रांतीयांना नोकरी देऊन स्थानिक युवकांना डावलले जाईल, अशी भीती काही नागरिकांमध्ये होती. मात्र, राज्य शासन, पालघर जिल्हा प्रशासन आणि जेएनपीए यांच्या समन्वयातून बाधित गावांमधील तरुणांना अधिकाधिक संधी मिळाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्रामार्फत शैक्षणिक पात्रतेनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे.

याशिवाय, आगामी काळात बाधित गावांमध्ये रस्ते, शाळा, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, अंगणवाडी, समाजमंदिर, धूपप्रतिबंधक बंधारे, व्यायामशाळा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या वानगाव येथील हरी जीवन चारिटेबल ट्रस्ट च्या जागेवर योग्य ते नियमाचे पालन करून या कंपनी कडून बोल्डर मुरूम मातीचे साठवणुकीचे काम सुरू आहे त्याठिकाणी सदया विविध पदांवर स्थानिक ६० कामगार कार्यरत असून, २४ ठेकेदारांमार्फत दगड व माती मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे त्यामुळे स्थानिक युवकांच्या रोजगाराबाबत सकारात्मक चित्र स्पष्ट होत असून, गावपातळीवरून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Post Next Post