पालघर दि. १२ : राज्यातील अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर आणि रॅपिडो चालकांमध्ये मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने तसेच प्रवाशांशी सुलभ व व्यावहारिक सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन, राज्य मराठी विकास संस्था विभागाने एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक पाऊल उचलले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, तसेच राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या सहकार्याने राज्यात अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर आणि रॅपीडो चालकांसाठी मराठी भाषा कार्यशाळा 1 जून 2026 ते 15ऑगस्ट 2026 पर्यंत राबवली जाणार आहे.
कार्यशाळेअंतर्गत सर्व संबंधित अमराठी चालकांसाठी किमान 4 तासिका पूर्ण करणे कायदेशीररीत्या बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या चालकांना परिवहन विभागामार्फत अधिकृत प्रमाणपत्र निर्गमित केले जाईल. सदर प्रमाणपत्र आपल्याजवळ बाळगणे सर्व चालकांसाठी अनिवार्य राहील.
परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या संकेतानुसार "वाहन चालकांचा जनतेशी येणारा दैनंदिन संपर्क लक्षात घेता, त्यांच्या भाषिक कौशल्यात वृद्धी होण्यासाठी आणि प्रादेशिक भाषेचा यथोचित आदर राखण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत प्रभावी ठरेल.
आपल्या पालघर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 12 केंद्रावर मराठी भाषा कार्यशाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व अमराठी रिक्षा, टक्सी, ओला, उबेर आणि रपीडो चालकांना आपल्या सोयीनुसार जवळील केंद्रावर जाऊन या कार्यशाळेत सहभाग नोंदवून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन, प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई मार्फत करण्यात येत आहे.
तसेच पालघर जिल्ह्यातील नोंदणीक्रत सर्व ऑटो रिक्षा, टक्सी चालक/मालक संघटना यांनी आपल्या अमराठी ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक मालक सभासद यांना ह्या कार्यशाळेत सहभाग नोंदवून प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन, प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई मार्फत करण्यात येत आहे.
-------------