पालघर - विनायक पवार
पालघर जिल्ह्यात मुकणे आडनावाच्या व्यक्तीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ओळख आणि जवळीक असल्याचे दाखवून तसेच अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करीत सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा (ठेके) मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
मुकणे आडनावाचा व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करून अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत आहे. या व्यक्तीचा भाजपशी कोणताही संबंध नसताना मुख्यमंत्र्यांच्या फोटो सोबत स्वतःचा फोटो लावून कामे पदरात पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगण्यात येते. मुकणे कडून स्वतःच्या नावे बांधकामाची कामे पदरात पाडून घेणे आणि प्रत्यक्ष काम स्वतः न करता परस्पर दुसऱ्या ठेकेदाराला देणे या प्रकरणामुळे शासकीय निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियमांच्या पालनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डहाणू परिसरात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या बांधकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिक व स्थानिकांकडून समोर येत आहेत. सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामांचा दर्जा आणि प्रत्यक्षातील स्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून अधिकाऱ्यांवरील दबावाची सत्यता समोर आणावी तसेच निकृष्ट कामांची तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व संबंधित घटकांवर कडक नियमानुसार कारवाई करण्यात यावेळी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.