पालघर पोलिसांची कारवाई! डहाणूतील २४ वर्षीय तरुणाकडून विनापरवाना गावठी बंदूक जप्त


पालघर : पालघर जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पालघर पोलिसांनी कारवाई केली असून, डहाणू तालुक्यातील ऐना पाटीलपाडा येथून एका तरुणाकडून विनापरवाना गावठी ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली आहे. अजय परशुराम पहाड (वय २४) असे संबंधित तरुणाचे नाव असून, त्याच्याविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासह अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्हा पोलीस दलाला दिले आहेत. त्यानुसार २२ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पालघरचे पथक डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेत होते.

यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत ऐना पाटीलपाडा येथील अजय परशुराम पहाड हा विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान अजय पहाड याच्या राहत्या घरात सुमारे १० हजार रुपये किमतीची गावठी ठासणीची बंदूक विनापरवाना बाळगल्याचे आढळून आले.

या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ए २६१/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ आणि २५ (१), तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड करीत आहेत.

ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड, पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, दीपक राऊत तसेच डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड आणि पोलीस अंमलदार खरपडे यांनी केली.

— जागरूक पालघर
Previous Post Next Post