दहा वर्षांपासून बंधाऱ्याचे काम रखडले; पूर्ण झाल्यावर तरी किती वर्षे टिकणार? उर्से-नानिवली बंधाऱ्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!

बोईसर : वसई-विरार शहराची वाढती तहान भागवण्यासाठी सूर्या नदीवर उभारण्यात येणारा उर्से-नानिवली बंधारा तब्बल दहा वर्षांनंतरही अपूर्णच आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाला प्रशासनाकडून चार वेळा मुदतवाढ देण्यात आली, तरीही काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता केवळ प्रकल्पाच्या विलंबाचाच नव्हे, तर बांधकामाच्या गुणवत्तेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. दहा वर्षे झाली तरी बंधारा पूर्ण होत नसेल, तर पूर्ण झाल्यानंतर तो किती वर्षे टिकणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

उर्से-नानिवली बंधाऱ्याच्या कामासाठी सुरुवातीला ३६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. १९ जानेवारी २०१६ रोजी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. निविदेतील अटींनुसार १७ जानेवारी २०१९ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने प्रशासनाकडून वारंवार मुदतवाढ देण्यात आली. २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ पर्यंत अशा चार वेळा मुदतवाढ देऊनही प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही.

विशेष म्हणजे, बंधाऱ्याचे बांधकाम टप्प्याटप्प्याने उभे राहत असले तरी त्याच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. दहा वर्षांच्या विलंबानंतर उभारण्यात येणारा हा बंधारा भविष्यात पाण्याचा मोठा प्रवाह आणि पुराचा ताण कितपत सहन करू शकेल? त्याची बांधकाम गुणवत्ता किती मजबूत आहे? आणि हा बंधारा किती वर्षे टिकणार? असे अनेक प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे केवळ काम पूर्ण करण्याची घाई न करता बांधकामाची निष्पक्ष तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे.

एकीकडे वसई-विरार शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना दुसरीकडे महत्त्वाचा बंधारा दहा वर्षांपासून रखडलेला आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न होण्यामागे नेमकी कारणे काय? बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी कधी होणार? आणि दहा वर्षे रखडलेला हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर तरी किती वर्षे टिकणार? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक आहे.

Previous Post Next Post