वाढवण बंदरासाठी ग्रीनफील्ड महामार्गाचे काम वेगात; सर्व्हिस रोडच्या कामाला सुरुवात

पालघर, दि. १९ जून : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाशी जोडण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या सेवा रस्त्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेस स्थिर व नियोजनबद्ध गती मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या या बंदर प्रकल्पाची अंमलबजावणी सर्व कायदेशीर प्रक्रिया, पारदर्शकता आणि दक्षता पाळून नियोजनपूर्वक करण्यात येत आहे. पालघर तालुक्यात सेवा रस्त्यासाठीचे भूसंपादन कार्य पूर्ण झाले असून, आवश्यक मॅन्ग्रोव्ह संदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर डहाणू तालुक्यातही पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
ग्रीनफिल्ड महामार्गासाठीचे भूसंपादन कार्य राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६ अंतर्गत प्रकल्पासाठी नियुक्त सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येत आहे.

डहाणू व पालघर तालुक्यातील एकूण २४ गावांचा या भूसंपादन प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावित भूसंपादनाचे एकूण क्षेत्रफळ ६०४.७४ हेक्टर इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे २८६ हेक्टर जमिनीचा ताबा यशस्वीरीत्या निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये डहाणू तालुक्यात १५७ हेक्टर तर पालघर तालुक्यात १२८ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून, एकूण २८६ हेक्टर क्षेत्राचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया देखील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा — नोटिसा बजावणे, सुनावण्या, पडताळणी, नुकसान भरपाई निश्चिती तसेच जमिनीचा ताबा घेणे — हे सर्व कामकाज प्रशासनामार्फत कायदेशीर प्रक्रियेचे पूर्ण पालन करून करण्यात आले आहे. तसेच संबंधित हितधारकांचे हित अबाधित राहावे यासाठी नुकसान भरपाई वितरण व न्यायालयीन ठेव प्रक्रियाही कार्यक्षमतेने पूर्ण करण्यात आली आहे.

पालघर तालुक्यातील भूसंपादन कार्य जवळपास पूर्णत्वास पोहोचणे हे वाढवण बंदर प्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास, रोजगारनिर्मिती तसेच महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापार व आर्थिक वृद्धीस मोठी चालना मिळणार आहे.

जिल्हा प्रशासन हा प्रकल्प कायदेशीर, पारदर्शक व लोकहिताचा विचार करून राबविण्यास कटिबद्ध असून, सर्व विभाग व स्थानिक घटकांमध्ये समन्वय साधून कामकाज सुरळीतपणे पुढे नेण्यात येत आहे.

— डॉ. इंदू राणी जाखड
जिल्हाधिकारी, पालघर
Previous Post Next Post