रिच २ मनी प्रकरणात ३६ कोटींचा आर्थिक व्यवहार?; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक खुलासा

बोईसरमधील ‘रिच २ मनी प्रायव्हेट लिमिटेड’ प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. फॉरेन्सिक लेखापरीक्षण अहवालानुसार या प्रकरणातील आर्थिक नुकसानाची अंदाजे रक्कम ५ कोटी ६१ लाख ९८ हजार रुपयांपासून तब्बल ३६ कोटी ३२ लाख ९४ हजार रुपयांपर्यंत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात BUDS Actचाही मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.

वर्ष २०१९ मध्ये Banning of Unregulated Deposit Schemes Act म्हणजेच BUDS Act लागू झाला. अनियंत्रित पद्धतीने नागरिकांकडून ठेवी किंवा पैसे स्वीकारण्यास आळा घालणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.

मात्र, फॉरेन्सिक अहवालानुसार ‘रिच २ मनी प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना २० जून २०२० रोजी झाली. त्यानंतर कंपनीकडून नागरिकांकडून पैसे स्वीकारण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांना २० ते ३६ टक्क्यांपर्यंत वार्षिक परताव्याचे आश्वासन देण्यात आल्याचा उल्लेख अहवालात आहे. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्यानंतर त्यांनी इतर नागरिकांनाही या योजनेत सहभागी केल्याचे सांगितले जाते. मात्र, पुढे परतावे थांबल्यानंतर तक्रारी दाखल झाल्या.

या प्रकरणात रोशन चंदनमल जैन यांना अटक करण्यात आली आहे.

मात्र, तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रोशन जैन यांच्या दोन भाच्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल ९ ते १० कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार झाल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, रोशन जैन यांच्या अटकेनंतरही या खात्यांमधून काही कंपन्यांकडे पैसे गेल्याचे व्यवहार समोर आल्याची माहिती आहे. हे पैसे कोणाच्या सांगण्यावरून पाठवण्यात आले आणि या पैशांचा पुढे नेमका कुठे वापर झाला, हा सध्या तपासाचा विषय आहे.

संबंधित भाच्यांनी आपल्या जबाबात ही बँक खाती रोशन जैन वापरत असल्याचे सांगितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या खात्यांमधील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची सखोल चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

याशिवाय फॉरेन्सिक अहवालात मुरलीधर दास आणि पूनम जैन यांच्यासह इतर व्यक्ती आणि संस्थांच्या खात्यांतील व्यवहारांचाही उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, या प्रकरणातील इतर व्यक्तींची नेमकी भूमिका काय होती? आणखी किती एजंट नागरिकांकडून पैसे गोळा करत होते? या माध्यमातून किती रक्कम जमा झाली? आणि हा पैसा नेमका कुठे वळवण्यात आला?

या सर्व बाबी आता तपासाचा विषय आहेत.

याच पार्श्वभूमीवर ७ ऑगस्ट २०२६ रोजी पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी या प्रकरणात Further Investigation म्हणजेच पुढील तपासाचे आदेश दिल्याची माहिती आहे.

त्यामुळे आता रोशन जैन यांच्याव्यतिरिक्त इतर संबंधित व्यक्तींची भूमिका, बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार, एजंटचे नेटवर्क आणि पैशांची संपूर्ण साखळी याबाबत पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

‘रिच २ मनी’ प्रकरणातील हे आर्थिक जाळे नेमके किती मोठे आहे? आणखी कोणाची नावे समोर येणार? आणि कोट्यवधी रुपयांचा हा पैसा अखेर कुठे गेला?

या सर्व प्रश्नांची उत्तरं आता Further Investigation मधून समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, फॉरेन्सिक अहवाल आणि चार्जशीटमधील उल्लेख हे तपास प्रक्रियेचा भाग आहेत. संबंधित व्यक्तींवरील आरोपांची अंतिम कायदेशीर पुष्टी न्यायालयीन प्रक्रियेत होणे बाकी आहे.

या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा — जागरूक पालघर.
Previous Post Next Post