बोईसर : बोईसर-चिल्हार रोड परिसरातील आर.एम.सी. (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट आणि क्रशर मशीनमधून मोठ्या प्रमाणात धूळ व वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप भूमिसेना आदिवासी एकता परिषदेने केला आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत संबंधित प्लांटची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
यासंदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व उपप्रादेशिक अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच बोईसर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, आर.एम.सी. प्लांट आणि क्रशर मशीनमधून मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असून, परिसरातील रस्त्यांवर तसेच नागरिकांच्या घरांमध्ये धुळीचे प्रमाण वाढत आहे. प्लांटमधील यंत्रसामग्रीमुळे ध्वनी प्रदूषण होत असून, अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचीही दुरवस्था होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित प्लांटकडे आवश्यक पर्यावरणीय परवानग्या, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा, धूळ नियंत्रण व्यवस्था आणि पाणी फवारणीची सुविधा आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्लांटचे Consent to Establish आणि Consent to Operate यांसह आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन धूळ व ध्वनी प्रदूषणाचे नमुने आणि मोजमाप घ्यावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लांटवर कारवाई करून गरज पडल्यास प्लांट बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने या गंभीर तक्रारीची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा वरिष्ठ कार्यालयांकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही भूमिसेना आदिवासी एकता परिषदेने निवेदनाद्वारे दिला आहे.