पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणांच्या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. रेल्वे स्थानकापासून नवापूर नाका, बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांवरील पदपथांवर अतिक्रमणांचा विळखा वाढत असताना अनधिकृत बांधकामे आणि शासकीय जमिनीवरील कब्जांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे कारण देत अतिक्रमणविरोधी कारवाया रखडत असल्याने अनधिकृत बांधकामांना अप्रत्यक्षपणे अभय मिळत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
वाढवण बंदर प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस मनुष्यबळ तैनात असल्याने स्थानिक पातळीवरील कारवायांसाठी पोलिसांची उपलब्धता कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचा फटका बोईसरच्या नागरी व्यवस्थेला बसत असून पादचारी आणि वाहनचालकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून संयुक्त कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाई कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे बोईसरमधील पदपथ आणि शासकीय जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का? की पोलीस बंदोबस्ताअभावी अतिक्रमणांचा हा प्रश्न असाच कायम राहणार? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रिपोर्ट : विकास सिंह | बोईसर