शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा

पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवाराच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. गणेशभक्तांना सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी पालघर शहरासह परिसरातील विविध गावांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणपतींच्या भक्तांनी या विनामूल्य सेवेचा लाभ घेतला. गणेशमूर्ती समुद्रात सुरक्षितपणे विसर्जित करण्यासाठी होडीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी परिवारातील सदस्यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजसेवा, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा उत्सव ठरावा, या भावनेतून शिरगाव मांगेलआळी परिवाराने हा उपक्रम राबविला. कोणतेही शुल्क न आकारता गणेशभक्तांना सेवा देत परिवाराने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले.

या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ‘सेवा हीच खरी गणेशभक्ती’ या भावनेचा प्रत्यय या उपक्रमातून आला.

शिरगाव मांगेलआळी परिवाराच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
Previous Post Next Post