बोईसर येथील नवीन रेल्वे यार्डसाठी जमीन हस्तांतरला मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने बोईसर काटकर पाडा येथील रेल्वे यार्ड प्रकल्पासाठी आवश्यक ४.९८५ हेक्टर (१२.३२) क्षेत्र वन जमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यास अंतिम मान्यता प्रदान केली आहे.
तारापूर एमआयडीसीतील स्टील, केमिकल, टेक्स्टाईल आणि इतर अवजड उद्योगांच्या मालवाहतुकीसाठी बोईसरमधील नवीन रेल्वे यार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पश्चिम रेल्वेच्या विराण-डहाणू चौपदरीकरण कामात सध्याचे पश्चिम बाजूकडील गुड्स यार्ड अडथळा ठरत असल्याने ही यार्ड बोईसर पश्चिमेकडील काटकर पाडा परिसरात स्थलांतरित केले जाणार आहे.
सध्या नवीन रेल्वे यार्डचे बांधकाम प्रगतीपथावर असून प्रकल्पासाठी आवश्यक वन जमीन हस्तांतरणाचा प्रश्न सुटल्याने प्रकल्पाच्या कामातील महत्वाचा अडथळा दूर झाला आहे. यार्डसाठी वन जमिनीव्यतिरिक्त सुमारे ७.७ हेक्टर खाजगी/बिगर-वन जमिनीचाही वापर केला जाणार आहे.
या बदल्यात पालघर जिल्ह्यातील सुमारे १० हेक्टर जमिनीवर पूरक वृक्षारोपण केले जाणार आहे.
चौकट :
बोईसर येथील गुड्स यार्ड नव्या ठिकाणी हलवल्याने विरार-डहाणू दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका (३ री व ४ थी लाईन) टाकण्याच्या कामाला गती मिळेल. बिरसा मुंडा चौक आणि बोईसर पालघर रस्त्यावरून अवजड मालवाहू गाड्यांची वाहतूक चित्रालय परिसरातील नव्या यार्डकडे वळवल्यामुळे बिरसा मुंडा चौकात होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल.
तारापूर एमआयडीसी आणि प्रस्तावित वाढवण बंदराच्या दृष्टीने आधुनिक आणि मोठ्या क्षमतेचे गुड्स यार्ड उपयुक्त ठरेल.