पालघर : पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाण आणि राडा प्रकरणात फरार असलेले आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना पालघर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मीरा रोड येथील जीसीजी क्लबमधून पोलिसांनी रोहित गावित यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती.
अटक केल्यानंतर पोलिसांनी रोहित गावित यांना न्यायालयात हजर केले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी केलेल्या मागणीनंतर न्यायालयाने रोहित गावित यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार रोहित गावित हे 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित गावित फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. त्यानंतर पालघर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मीरा रोड येथून त्यांना ताब्यात घेतले.
रोहित गावित यांच्या अटकेनंतर आता पोलीस कोठडीदरम्यान या प्रकरणाचा तपास पुढे नेण्यात येणार आहे. या घटनेमागील नेमकी कारणे, मारहाणीची पार्श्वभूमी आणि प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.