BOISAR NEWS | आशा डायला रंगीत रसायनयुक्त पाणी थेट नैसर्गिक नाल्यात? पर्यावरण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील T-64 आणि T-65 येथील आशा डायला या कारखान्याच्या गार्डनखालून पाइप टाकून निळ्या रंगाचे रसायनयुक्त पाणी थेट नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरण आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच नवापूर खाडीत रासायनिक पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच तारापूर औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारे रसायनयुक्त पाणी नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचे दिसून आल्याने चिंता वाढली आहे.

यापूर्वी एमपीसीबी, एमआयडीसी आणि सीईटीपी प्रशासनाकडून परिसरातील गटारे आणि नाल्यांची पाहणी करण्यात आली होती. काही ठिकाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये भराव टाकून त्यांचा प्रवाह बंद करण्यात आल्याचेही समोर आले होते.

त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, आशा डायला कारखान्यातून सोडले जाणारे हे पाणी नेमके कुठून येते? त्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे का? आणि हे पाणी नैसर्गिक नाल्यात सोडण्याची परवानगी आहे का?

या संपूर्ण प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून पाण्याचे नमुने तपासण्याची गरज आहे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post