मोटारसायकल चोरीचा छडा; आरोपी जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

पालघर : डहाणू तालुक्यातील धरमपूर-बापुगाव परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात कासा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी रुचित सुभाष दोडे (रा. आंबेघर पाटीलपाडा, ता. विक्रमगड) याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास दिलीप रामा हारके (वय ५३, रा. धरमपूर, बापुगाव, ता. डहाणू) यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक MH-48-AJ-8403 घराच्या ओटीवर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय ही मोटारसायकल चोरून नेली होती. याप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कासा पोलिसांनी तपास पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित रुचित दोडे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सदर चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकलही जप्त केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महेश कडव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात महेश कडव यांच्यासह पोलीस कर्मचारी ठाळकर व सय्यद यांचा सहभाग होता.
Previous Post Next Post