बोईसर : महागाव रोडवर पायी घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिसांच्या संयुक्त तपासातून या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून चोरीचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कुटी जप्त करण्यात आली आहे.
दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.५७ वाजता संगिता संजय गोलीम (वय ३५), रा. वारंगडे, तळेकरपाडा, ता. जि. पालघर या महागाव रोडवरील पॉवर ग्रिडसमोरून पायी घरी जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कुटीवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यावर हात मारून सुमारे २० हजार रुपये किमतीचे, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून पलायन केले.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलीस ठाण्याची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बोईसर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार प्रदीप सोमनाथ बॅनर्जी (वय ५०), रा. यादवनगर, बोईसर पूर्व, मूळ रा. पश्चिम बंगाल, याला २६ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती.
तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्हा करताना वापरलेली स्कुटी जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव राठोड, बोईसर पोलीस ठाणे करीत आहेत.
ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.