पालघर : पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड ते पालघर रेल्वे स्थानकादरम्यान काकीनाडा-भावनगर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी डाऊन मार्गावर ही घटना घडली. या बिघाडामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, केळवे रोड आणि पालघर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर धावणाऱ्या काकीनाडा-भावनगर एक्सप्रेसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आणि काही काळ गाड्यांचा खोळंबा झाला.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. सध्या अनेक गाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे.
रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली असली तरी गाड्यांना होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.