पालघरमध्ये गुटख्याची मोठी तस्करी उघड; १.५० कोटींचा मुद्देमाल जप्त

पालघर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर परिसरात सापळा रचून एका टेम्पोमधून तब्बल १ कोटी ३० लाख ८६ हजार रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला २० लाख रुपये किमतीचा टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १ कोटी ५० लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, टेम्पोचा चालक आणि क्लिनर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे महामार्गावर सापळा

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पालघरचे सहाय्यक आयुक्त प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी विश्वासराव भोये आणि प्र. शि. कच्छवे यांच्या पथकाने मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर, हॉटेल मनोर गेटसमोर वाडे खडकोणा गावाच्या हद्दीत सापळा रचला.

९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारा संशयित टेम्पो पथकाने थांबवला. वाहनाची आणि चालकाची प्राथमिक तपासणी करताना संशयास्पद हालचाली आढळल्याने मनोर पोलिसांच्या मदतीने टेम्पोची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

मुद्देमाल जप्त करताना चालक आणि क्लिनर फरार

जप्त केलेल्या मुद्देमालाची मोजदाद केल्यानंतर तो मनोर पोलीस ठाण्यात नेण्याची प्रक्रिया सुरू होती. याचदरम्यान टेम्पोच्या आडोशाचा फायदा घेत चालक कन्हैयालाल कालुराम गेहलोत (वय ३४) आणि क्लिनर राहुल हिरालाल देपन (वय २६), दोघेही राजस्थानचे रहिवासी, यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या दोघांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

गुजरातपासून पुण्यापर्यंतच्या व्यवहाराची माहिती उघड

प्राथमिक चौकशीत हा प्रतिबंधित मुद्देमाल गुजरातमधील वापी येथील शक्ती ट्रेडर्समधून सुरेश माळी आणि कमलेश माळी यांच्याकडून वाहनात भरण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच नाशिक आणि वापी येथील सुनील अमृतकर व पुण्यातील निलेश लालवाणी यांच्या मध्यस्थीने हा माल लोणावळा येथील सोनू देवाशी याला पुरवला जाणार असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. याशिवाय नालासोपारा येथील वाहनमालक शाजी मुन्दनानिक्क्ल इलियास याचाही या प्रकरणात समावेश असल्याचे समोर आले आहे.

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विश्वासराव प्रकाश भोये यांच्या फिर्यादीवरून मनोर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंडे करत आहेत.

पालघर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
Previous Post Next Post