जव्हारमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम! _हनुमान पॉईंट व जयसागर धरण परिसरात स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन; १२५ श्री सदस्यांचा सक्रिय सहभाग_

 जव्हार प्रतिनिधी : रेहान शेख
जव्हार : शहरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांचे सौंदर्य जपण्यासह पर्यावरणाचे संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने हनुमान पॉईंट आणि जयसागर धरण परिसरात वृक्षसंवर्धन व स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जवळपास १२५ श्री सदस्य सहभागी होत असून, दर रविवारी श्रमदानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले जात आहे. 

तीर्थरूप डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि तीर्थरूप डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या विचारांतून व मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन श्री सदस्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सुरू असलेल्या या अभियानामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच वृक्षांच्या संगोपनाला प्रोत्साहन मिळत आहे. 

 *वृक्षांचे संगोपन आणि परिसराच्या स्वच्छतेवर भर* 

जव्हार शहराला निसर्गसौंदर्याची अनमोल देणगी लाभली आहे. येथील पर्यटनस्थळांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संगोपन व संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने श्री सदस्यांकडून वृक्षांची निगा राखणे, त्यांना पाणी देणे आणि परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी नियमित श्रमदान केले जात आहे. 

केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नसून, लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन करून ती जगविणेही तितकेच आवश्यक आहे. हा विचार प्रत्यक्ष कृतीतून रुजविण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून केला जात आहे. 

 *दर रविवारी श्रमदानातून सामाजिक बांधिलकी* 

महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जव्हारमध्ये सुरू असलेल्या या अभियानातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच निसर्गाप्रती जबाबदारीची भावना वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

 *पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा* 

हनुमान पॉईंट आणि जयसागर धरण परिसरातील नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी श्री सदस्यांकडून सातत्याने केले जाणारे श्रमदान कौतुकास्पद ठरत आहे. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपल्या परिसराची स्वच्छता राखावी, वृक्षांचे संरक्षण करावे आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. 

‘ *झाडे लावा, झाडे जगवा आणि स्वच्छता राखा’ हा संदेश कृतीतून देणाऱ्या या अभियानामुळे जव्हारमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला सकारात्मक चालना मिळत आहे.*
Previous Post Next Post