बोईसर-तारापूर मार्गावर महिलांची सुरक्षा धोक्यात; मंगळसूत्र चोरीची घटना

बोईसर | प्रतिनिधी
तारापूर ग्रामपंचायत परिसरात वर्षानुवर्षे भाजी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी जबरीने खेचून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना म्हात्रे (वय ६३) या महिला दररोजप्रमाणे सोमवारी सायंकाळी भाजी विक्री करून कुडण येथील आपल्या घरी परतत होत्या. त्या सहा आसनी रिक्षातून उतरून तारापूर - बोईसर मार्गावरील कुडण नवापाडा बसस्टॉप परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
घटना घडल्यानंतर चोरटे भरधाव वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेची विचारपूस केली.
या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Previous Post Next Post