केळवा धरण १०० टक्के भरले २.९५१ क्युसेक्स विसर्ग *सुरू*, *जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी काळजी घ्यावी* *जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे आवाहन*

*धरण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाची संयुक्त मोहीम*
पालघर, ६जुलै २०२६ :पालघर तालुक्यातील महिम-केळवा लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेले केळवा धरण मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून २.९५१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे .जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले 
   पश्चिम रेल्वेच्या मुंबई–सुरत मार्गावरील केळवारोड स्थानकाजवळील झांगरोली गावाशेजारील स्थानिक नाल्यावर उभारण्यात आलेले हे धरण सन १९८१ मध्ये पूर्ण झाले असून, गेली ४५ वर्षे परिसराला सिंचनाचा लाभ देत आहे.
सध्या धरणातील जलसाठ्याची पातळी ३.२४२ दलघमी इतकी असून धरण १०० टक्के भरले आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे नियमानुसार पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन धरणाखालच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तहसीलदार पालघर यांच्या समन्वयाने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच जलसंपदा विभागाची यंत्रणा , पोलिस घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, पोलीस अधिक्षक यतीश देशमुख,सातत्याने लक्ष ठेवत आहेत.
पुढील गावांनी सतर्क रहावे
दसमाळा, भुतान माळ, झांझरोळी, भरणपाडा, टोकराळे, देवीपाडा, देवशेत पाडा, मायखोप, पाटीलपाडा, पळगेपाडा, तरडेपाडा, बेंदळी, राठे, रवलपाडा आणि माकुणसार या आणि परिसरातील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
    जलसंपदा विभाग आणि महसूल, पोलीस प्रशासन संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेत असून, सद्यस्थितीत धरण परिसरातील नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र नदी-नाले, धरणाचा सांडवा आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले .
Previous Post Next Post