तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या NOC आणि ना-हरकत दाखल्यासाठी तब्बल चार हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या संजय पागधरे यांनी एका नागरिकाकडून आवश्यक कागदपत्रांसाठी चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधित नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने तारापूर ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला.

तारापूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. लाचेची रक्कम स्वीकारताना महिला सरपंचांना रंगेहाथ पकडण्यात आलं. या कारवाईनंतर ग्रामपंचायत परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आरोपी महिला सरपंचांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Previous Post Next Post