पालघरमध्ये हरित महाराष्ट्र अभियानाला वेग; 33.02 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट, आतापर्यंत 4.88 लाख वृक्षांची लागवड

पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे वृक्षलागवडीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, हरित महाराष्ट्र अभियानाला मोठी गती मिळाली आहे. सन 2026-27 या वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या एक कोटी वृक्षलागवड अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्याला 33 लाख 2 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी 4 लाख 88 हजार 104 वृक्षांची लागवड आतापर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

यंदाच्या चांगल्या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढली असून, वृक्षांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विविध शासकीय विभागांनी उपलब्ध जमीन, स्थानिक परिस्थिती आणि रोपांची उपलब्धता लक्षात घेऊन नियोजनबद्ध वृक्षलागवड सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागनिहाय प्रगतीचा नियमित आढावा घेतला जात असून, निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

वृक्षसंवर्धनावरही विशेष भर

केवळ वृक्षलागवड न करता लागवड केलेल्या प्रत्येक रोपाचे संरक्षण, संवर्धन आणि नियमित देखभाल करण्यावर जिल्हा प्रशासनाने विशेष भर दिला आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड करण्याचा प्रशासनाचा मानस असून, नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून "हरित पालघर" घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

गतवर्षी उद्दिष्टापेक्षा 6.44 लाख अधिक वृक्षांची लागवड

सन 2025-26 मध्ये पालघर जिल्ह्याला 38 लाख 40 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र विविध विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात 44 लाख 84 हजार 260 वृक्षांची लागवड करण्यात आली. म्हणजेच निर्धारित उद्दिष्टापेक्षा सुमारे 6 लाख 44 हजार अधिक वृक्षांची लागवड करून पालघर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

विशेष अभियानातून व्यापक वृक्षलागवड

महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत विशेष वृक्षलागवड अभियान राबविण्यात आले. या काळात विविध शासकीय विभागांनी स्थानिक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीला अनुरूप प्रजातींच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.

जलसंवर्धनालाही प्राधान्य

विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान – ग्रामीण (व्हीबी-जी राम जी) अंतर्गत जिल्ह्यात 531 जलतारा कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांमुळे भूजलपातळी वाढण्यास, जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि नव्याने लावलेल्या वृक्षांच्या संवर्धनास मोठी मदत होणार आहे.

योजनेअंतर्गत आतापर्यंत:

- व्हीबी-जी राम जी योजनेतून: 1,59,544 वृक्ष
- इतर निधीतून: 3,28,560 वृक्ष

सर्वाधिक वृक्षलागवड करणारे विभाग

आतापर्यंत सर्वाधिक वृक्षलागवड करणाऱ्या विभागांमध्ये:

- उप वनसंरक्षक, वन विभाग डहाणू – 2,14,400
- उप वनसंरक्षक, वन विभाग जव्हार – 60,565
- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर – 41,600
- विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), डहाणू/ठाणे – 33,600
- रेशीम विकास विभाग, जव्हार – 30,000

'अमृतवृक्ष' ॲपद्वारे ऑनलाइन नोंद

वृक्षलागवडीची ऑनलाइन नोंद व वृक्षसंवर्धनावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाने 'अमृतवृक्ष' हे ॲप विकसित केले आहे. या ॲपचा वापर नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय विभागांनी करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तसेच, वृक्षलागवडीच्या कामात पारदर्शकता राखण्यासाठी 'NoteCam Photo' च्या माध्यमातून संपूर्ण कामाचे दस्तऐवजीकरण करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिक, खाजगी कंपन्या, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी व्हीबी-जी राम जी अभियानाद्वारे पर्यावरण संवर्धनासोबत ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत असल्याचे सांगितले.
Previous Post Next Post