Jawhar News | दाभोसा धबधब्यावर रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले; वनविभागाच्या तत्परतेने बचाव, सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

जव्हार प्रतिनिधी – रेहान शेख
जव्हार तालुक्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर रविवारी दुपारी एक धक्कादायक दुर्घटना घडली. धबधबा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले जुने लोखंडी रेलिंग अचानक तुटल्याने दोन पर्यटक दरीत कोसळले. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित पर्यटक, स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य राबवल्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. जखमी पर्यटकांना उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पावसाळ्यामुळे दाभोसा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. रविवारीही अनेक पर्यटक निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते. याचवेळी दोन पर्यटक छायाचित्र काढण्यासाठी रेलिंगजवळ उभे असताना अचानक रेलिंगचा आधार तुटला आणि दोघेही तोल जाऊन दरीत कोसळले.

घटना घडताच परिसरात काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि उपस्थित पर्यटकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य राबवून दोन्ही जखमींना सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेनंतर दाभोसा धबधबा परिसरातील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची नियमित तपासणी व देखभाल केली जात होती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्याने मजबूत व सुरक्षित रेलिंग उभारणे, धोक्याची सूचना देणारे फलक लावणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, प्रथमोपचार केंद्र उपलब्ध करून देणे तसेच प्रशिक्षित बचाव पथक कायमस्वरूपी तैनात करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे.

पर्यटकांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी दाभोसा धबधबा परिसरातील संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
Previous Post Next Post