५ ऑगस्टपासून बोईसरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; रस्ते, गटारे मोकळी करण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय
बोईसर | बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्ते, गटारे, नाले तसेच इमारतींच्या गाळ्यांसमोरील अनधिकृत अतिक्रमणांवर ५ ऑगस्टपासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
ग्रामपंचायतीच्या १५ जुलै २०२४ रोजी झालेल्या मासिक सभेत तसेच १८ जुलै आणि १३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत सार्वजनिक रस्ते अडवणारे फेरीवाले, दुकानांबाहेर सामान ठेवणारे व्यापारी आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार आता विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ४५ व ५३ नुसार सार्वजनिक रस्ते, गटारे, नाले किंवा मोकळ्या जागांवर कुंपण, ओटे, खांब, शेड, गाळे अथवा अन्य प्रकारचे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अतिक्रमण करण्यास मनाई आहे. तसेच दुकानांबाहेर सामान ठेवून रस्ता अडविणाऱ्यांवरही कारवाईची तरतूद आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एक हजार रुपयांपर्यंत दंड, तसेच अतिक्रमण कायम ठेवल्यास प्रतिदिन २०० रुपयांपर्यंत अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो. कारवाईदरम्यान होणारा खर्च संबंधितांकडून मालमत्ता कराप्रमाणे वसूल करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील.
ग्रामपंचायतीने ५, १२ आणि १९ ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन केले असून त्यानंतरही आवश्यकतेनुसार कारवाई सुरू राहणार आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वखर्चाने अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.