पालघर नगर पथविक्रेता समितीत झुबेर शेख, निमा खुर्दे बिनविरोध. --अल्पसंख्याक व अनुसूचित जाती (महिला राखीव) प्रवर्गातून निवड; पथविक्रेत्यांच्या प्रश्नांना मिळणार सक्षम व्यासपीठ

पालघर प्रतिनिधी | नदीम शेख
पालघर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक २०२६ मध्ये अल्पसंख्याक तसेच अनुसूचित जाती (महिला राखीव) प्रवर्गातून अनुक्रमे झुबेर मोहम्मद युसूफ शेख आणि निमा रमेश खुर्दे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे पालघर शहरातील पथविक्रेत्यांच्या विविध प्रश्नांना समितीच्या माध्यमातून सक्षम व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पालघर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी जारी केलेल्या अधिकृत निवडणूक प्रमाणपत्रानुसार, दि. २७ जुलै २०२६ रोजी झुबेर मोहम्मद युसूफ शेख यांची अल्पसंख्याक प्रवर्गातून नगर पथविक्रेता समिती सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे निमा रमेश खुर्दे यांची अनुसूचित जाती (महिला राखीव) प्रवर्गातून नगर पथविक्रेता समिती सदस्या म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचेही नागरिक व पथविक्रेता वर्गातून स्वागत करण्यात येत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक आणि इतर पथविक्रेत्यांच्या व्यवसायाशी संबंधित अडचणी सोडविणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे, व्यवसायासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, या दृष्टीने नगर पथविक्रेता समितीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

झुबेर शेख आणि निमा खुर्दे यांच्या बिनविरोध निवडीमुळे पथविक्रेत्यांच्या समस्या प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पथविक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण तत्पर राहू, असा निर्धार दोन्ही नवनिर्वाचित सदस्यांकडून व्यक्त करण्यात आला.

या दोन्ही निवडीबद्दल विविध सामाजिक, व्यापारी, अल्पसंख्याक संघटना तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पालघर शहरातील पथविक्रेत्यांच्या हितासाठी या निवडी महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Previous Post Next Post