पालघर : जिल्ह्यातील बचत गटांना सक्षम करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात असताना, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहाच्या ठेक्यावरून आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपाहारगृहाचा ठेका संपून सुमारे १९ ते २० महिने उलटले असतानाही नवीन निविदा प्रक्रिया रखडल्याचा आरोप होत आहे.
जिल्हा मुख्यालय संकुलातील उपाहारगृहासाठी २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून एका स्थानिक हॉटेल व्यावसायिकाला ठेका देण्यात आला होता. एप्रिल २०२४ मध्ये ठेका संपल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला डिसेंबर २०२४ पर्यंत जुन्या भाडेतत्त्वावर उपाहारगृह चालवण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र, त्यानंतरही नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात विलंब झाल्याचा आरोप होत आहे. तसेच पूर्वी ‘ताशी मल्टिकुझाईन रेस्टॉरंट’ या नावाने असलेल्या ठेक्याचे ‘प्रतीक केटरर्स’ या नावात रूपांतर करताना निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
महिन्याला ८५ हजार रुपये भाडे
उपाहारगृहासाठी संबंधित ठेकेदाराला दरमहा सुमारे ८५ हजार रुपये भाडे द्यावे लागत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांना माफक दरात भोजन उपलब्ध करून देण्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
बचत गटांना संधी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यात ‘उमेद’अंतर्गत सरस तसेच विविध प्रदर्शनांमध्ये बचत गटांकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले जातात. या स्टॉलना मिळणारा प्रतिसाद पाहता जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृह बचत गटांना नाममात्र भाड्यावर चालवण्यासाठी द्यावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने २४ जुलै रोजी मुदत संपलेले अन्नपदार्थ आणि अस्वच्छतेच्या कारणावरून या उपाहारगृहावर कारवाई करत ते बंद केले होते. आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर १० ऑगस्टपासून उपाहारगृह सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नागरिकांना माफक दरात थाळीची अपेक्षा
पालघर शहरात अनेक ठिकाणी ६० ते ७० रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध होत असताना, जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठीही माफक दरात भोजन उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, “जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृह चालवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यावेळी भाडे मर्यादित ठेवून माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत,” अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली आहे.