जव्हार | प्रतिनिधी – रेहान शेख
जव्हार शहरातील महत्त्वाचा आणि व्हीआयपी रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र काळे सर्व्हिस सेंटर ते राजीव गांधी मैदान या मार्गाचे डांबरीकरण झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच रस्ता उखडू लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सुमारे पाच ते सहा वर्षांनंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण होऊन जेमतेम दोन महिने होत असतानाच रस्त्यावरील डांबर उखडू लागले असून अनेक ठिकाणी खडी बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्ते विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र, नव्याने तयार झालेला रस्ता काही महिन्यांतच खराब होत असेल, तर सार्वजनिक निधीचा योग्य वापर होत आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
या मार्गालगत उपविभागीय पोलीस कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, प्रांत अधिकाऱ्यांचे निवासस्थान, जव्हार पोलीस निरीक्षकांचे निवासस्थान तसेच मुख्याधिकारी यांचे निवासस्थान असल्याने हा रस्ता प्रशासनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे.
दरम्यान, या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक आणि वाहने ये-जा करतात. रस्त्याची अवस्था खालावल्याने अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करावी, तसेच उखडलेला रस्ता तातडीने दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आता या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेऊन तातडीने कारवाई करतो का, याकडे जव्हारकरांचे लक्ष लागले आहे.