जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी होणार?
बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पालघर दौऱ्यात कारवाईचे आश्वासन
पालघर जिल्ह्यातील जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारींची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. पालघर दौऱ्यादरम्यान नागरिकांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली.यावेळी प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील विविध विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे, निधीचा गैरवापर तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
आता मंत्र्यांच्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात चौकशी सुरू होऊन कारवाई होते का, याकडे पालघर जिल्ह्यासह जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.