पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातून संशयास्पदरीत्या वाहतूक करण्यात येत असलेल्या रासायनिक घनकचऱ्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील पिंपांमध्ये आढळलेले रसायन घातक असल्याचा प्रयोगशाळा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) प्राप्त झाला आहे.
७ मे रोजी बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना एमएच ४३ बीपी ६९२९ क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी अडवला होता. चालकाकडे मालासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे नसल्याने ट्रकची तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये सुमारे ८० ते ९० प्लास्टिकची पिंपे आढळून आली. पिंपांमधून उग्र दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना घातक रासायनिक घनकचऱ्याचा संशय आला.
चौकशीत हा माल तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरे ड्रग्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेडच्या कारखान्यातून आणण्यात आल्याचे चालकाने सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून रासायनिक नमुने घेतले आणि ते मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
तब्बल तीन महिन्यांनंतर प्राप्त झालेल्या अहवालात ट्रकमधील रसायन घातक असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती एमपीसीबीने दिली आहे. या घातक रसायनाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करणे आवश्यक असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आरे ड्रग्सच्या कारखान्याच्या तपासणीत प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले आहे. कारखान्यातील स्काडा प्रणाली व गाळणी यंत्रणा अकार्यक्षम आणि गंजलेल्या अवस्थेत असल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सांडपाण्याचे प्रदूषण मापदंड निर्धारित मानकांपेक्षा अधिक असल्याचेही आढळले.
विशेष म्हणजे, संमतीपत्रानुसार दरमहा तीन मेट्रिक टन घातक घनकचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी पाठवणे अपेक्षित असताना, गेल्या वर्षभरात केवळ २४९ किलो घातक घनकचरा अधिकृतरीत्या पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उर्वरित घनकचऱ्याची विल्हेवाट नेमकी कुठे करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या उल्लंघनांची दखल घेत २७ जून २०२६ रोजी आरे ड्रग्सच्या कारखान्याला उत्पादनबंदीचे आदेश देण्यात आले असून, दोन लाख रुपयांची बँक गॅरंटीही जप्त करण्यात आली आहे.
आता १३ ऑगस्ट रोजी एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी बोईसर पोलिसांना पत्र देऊन संबंधित वाहन चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे घातक रासायनिक कचऱ्याची वाहतूक, विल्हेवाट आणि कारखान्यातील कथित प्रदूषण नियमांच्या उल्लंघनाबाबत पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.