पालघर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघर जिल्हा पोलीस दलातील एकूण १५ पोलीस अधिकारी व अंमलदारांना अति उत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. दीर्घकालीन तसेच निष्कलंक आणि उल्लेखनीय पोलीस सेवेची दखल घेत या अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन व उत्कृष्ट सेवेसाठी २५ वर्षांच्या सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’, तर १५ वर्षांच्या सेवेसाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात येते.
२५ वर्षांच्या सेवेसाठी अति उत्कृष्ट सेवा पदक
पालघर पोलीस दलातील ७ अधिकारी व अंमलदारांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये पोलीस उप अधीक्षक रविंद्र सुभाष नाईक, पोलीस निरीक्षक रणवीर प्रकाश बयंस, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बाजीराव किंद्रे, पोलीस उप निरीक्षक रविंद्र बाबुराव वानखेडे, पोलीस उप निरीक्षक अनिल पांडुरंग दिघोळे, सहायक पोलीस उप निरीक्षक प्रकाश महादु नवले आणि सहायक पोलीस उप निरीक्षक किरण हरीश्चंद्र अंभीरे यांचा समावेश आहे.
१५ वर्षांच्या सेवेसाठी उत्कृष्ट सेवा पदक
तर ८ पोलीस अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप श्रीपती पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल साहेबराव जाधव, पोलीस उप निरीक्षक विशाल राजेंद्र शिर्के, पोलीस हवालदार दिपक शांताराम राऊत, पोलीस हवालदार सचिन नारायण चौधरी, पोलीस हवालदार पराग कमलाकर म्हात्रे, पोलीस हवालदार नरेंद्र नाना पाटील आणि पोलीस हवालदार दिनेश मावजी गायकवाड यांचा समावेश आहे.
या सर्व अधिकारी व अंमलदारांनी पोलीस सेवेत दीर्घकाळ प्रामाणिकपणे आणि उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी सेवा पदक प्राप्त करणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेला हा सन्मान पालघर पोलीस दलासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.