२२६ उमेदवारांची थेट मुलाखतीतून निवड
पालघर, दि. २९ सप्टेंबर २०२६ : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या २१ रोजगार महाकुंभ रोजगार मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यांमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून २२६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध नामांकित कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभाग घेतला. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य, अनुभव आणि उपलब्ध रिक्त पदांच्या आवश्यकतांनुसार थेट मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना एकाच व्यासपीठावर विविध कंपन्यांशी संपर्क साधण्याबरोबरच उपलब्ध पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखत देण्याची संधी मिळाली.
उत्पादन, सेवा, लॉजिस्टिक, हॉस्पिटॅलिटी, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, रिटेल यांसह विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी मेळाव्यांमध्ये सहभाग नोंदविला. पात्र उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्याला अनुरूप पदांसाठी मुलाखती दिल्या.
रोजगाराच्या संधी आणि उद्योगांची मनुष्यबळाची गरज यांच्यात प्रभावी समन्वय साधण्यावर भर या उपक्रमातून देण्यात आला. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळावे आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्यात यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
बदलत्या औद्योगिक गरजा आणि रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून युवक-युवतींना विविध कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक कौशल्यांसोबतच संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि अन्य सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यावरही भर देण्यात येत आहे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष रोजगार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
रोजगार मेळावे खालील ठिकाणी संपन्न झाले
रामअवतार सूरजमल मोदी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोर्डी; जी.एस.पी. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, तलासरी; भानुदास मणीराम सावे शिक्षण संस्थेची एल. जे. राऊत खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिंचणी; दिवाकर पाटील खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पास्थळ; लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, पालघर; गोवलीस इंडस्ट्रीज असोसिएशन, वसई; युनिव्हर्सल स्किलटेक युनिव्हर्सिटी, वसई; प्रगती एज्युकेशन सोसायटीचे प्रगती पदवी कॉलेज, वसई; न्यू विवा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, विरार; कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ओंदे; भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार; वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स, हरोसाळे, वाडा; वीर तिलका मांजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोखाडा; गोवर्धन स्किल सेंटर, गालतरे; ज्ञानदीप मंडळाचे सेंट जोसेफ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स; सोनोपंत दांडेकर कला, वि. श्री. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर; थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग; शिक्षक संचलित शिक्षण संस्थेचे डॉ. डी.एस.डी.डी. कला महाविद्यालय वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाडा; बीटीआरआय, वाणगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था; शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तलासरी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालघर येथे रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची थेट दारे खुली होत असून, कौशल्यविकास आणि उद्योगांच्या गरजा यांचा समन्वय साधत जिल्ह्यातील रोजगार परिसंस्थेला बळ देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.