पालघर महावितरणचा वायरमन ८ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

पालघर, ता.) : जास्तीचे आलेले वीज बिल कमी करून ‘सेटल’ करून देण्याच्या मोबदल्यात आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पालघर महावितरण विभागातील कनिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. प्रदीप सुभाष महाजन (वय 38, रा. उमरोळी) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पालघर तालुक्यातील खारेकुरण-दांडीपाडा परिसरातील एका वीज ग्राहकाचे बिल जास्त आल्याने त्यांनी महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी संबंधित जास्तीचे वीज बिल ‘सेटल’ करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी महाजन यांनी केल्याचा आरोप आहे.

या प्रकाराबाबत संबंधित वीज ग्राहकाने बुधवारी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता महाजन यांनी लाचेची मागणी केल्याची पुष्टी झाली.

त्यानंतर गुरुवारी खारेकुरण येथील मिठागर रोड परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताच महाजन यांना रंगेहात पकडण्यात आले.

महाजन यांच्याविरुद्ध पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दादा राम करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश डांगे, विलास भोई, जितेंद्र गवळी, प्रकाश दळवी आणि आकाश लोहारे यांच्या पथकाने केली.
Previous Post Next Post