तारापूर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील अलीकडील मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देत फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट, तारापूर आणि ठाणे-पालघर जिल्हा ग्रामीण मुस्लिम उत्कर्ष संघटना (तंझीम), भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (2 ऑगस्ट) अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत तारापूर गाव, तेलीवाडा, बायपास, नवापाडा-चिंचणी तसेच बोईसर खैराफाटा झोपडपट्टी परिसरातील सुमारे 100 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.
गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः तारापूर-चिंचणी किनारपट्टी आणि झोपडपट्टी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
अन्नधान्य वाटपाचा शुभारंभ तारापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष अयाजुद्दीन शेख प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाला खुदादाद शेख, तकयुद्दीन शेख, हुसेन शेख, कौसर शेख, अफझल शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे छायाचित्रण तल्हा शेख यांनी केले.
यावेळी उपस्थितांनी पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे संकटग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून समाजातील सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.