जव्हार अर्बन बँकेची पुरस्कारांची हॅट्ट्रिक राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारात द्वितीय क्रमांक

जव्हार प्रतिनिधी : रेहान शेख
जव्हार : दि. जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम ठेवत आणखी एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. 

 दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०२५-२६” मध्ये जव्हार अर्बन बँकेने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हा पुरस्कार १२ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला. 

बँकेचे चेअरमन धिरज निलेश सांबरे, व्हाईस चेअरमन मुद्दसरभाई पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मुकणे तसेच संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 
गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत बँकेला राष्ट्रीय व राज्य पातळीवर सलग तीन मानाचे पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या कामगिरीची विशेष चर्चा होत आहे. 

सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार, सन २०२४-२५ मध्ये Blue Ribbon राष्ट्रीय पुरस्कारातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान, तर सन २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार – द्वितीय क्रमांक असा पुरस्कारांचा प्रवास राहिला आहे. 

बँकेच्या माहितीनुसार, थकीत कर्जदारांकडून प्रभावी वसुली, आर्थिक शिस्त, अनावश्यक खर्चाला आळा, प्रभावी नियोजन तसेच कामकाजातील त्रुटी दूर करण्यावर सातत्याने भर देण्यात आला. आर्थिक अडचणी आणि मोठ्या एनपीएच्या पार्श्वभूमीवर बँकेला सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना या पुरस्कारांच्या माध्यमातून पावती मिळाल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

लोकनेते व शिवसेना उपनेते तसेच ठाणे जिल्हा बँकेचे संचालक निलेश साबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान संचालक मंडळ व प्रशासनाने केलेल्या कामगिरीचे हे यश असल्याचे बँकेकडून नमूद करण्यात आले. 

दरम्यान, ग्राहक, सभासद, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी यांच्या विश्वासामुळेच हे यश शक्य झाले असून, सामान्य कष्टकरी नागरिकांची बँक अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगत करण्यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचा संकल्प बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. 

या पुरस्काराबद्दल बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद, हितचिंतक तसेच बँकेच्या प्रगतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Previous Post Next Post