पालघर | प्रतिनिधी
२२ व २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेला नरपाड–आंबेवाडी नाका येथील प्रमुख राज्य महामार्ग क्र. ४ वरील रस्ता अवघ्या दोन दिवसांत वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आल्याची माहिती पालघर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच चिखले–नावखाडी रस्त्यावरील दुरुस्तीचे कामही अंतिम टप्प्यात असून तोही लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
पुरामुळे नरपाड परिसरात दोन ठिकाणी अनुक्रमे ६० मीटर व ७० मीटर लांबीचा रस्ता वाहून गेला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या सततच्या देखरेखीखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम हाती घेतले.
तात्पुरत्या उपाययोजनेअंतर्गत १२०० मिमी व्यासाचे 'NP-3' दर्जाचे ह्यूम पाईप बसविण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दगड, खडी, जीएसबी व इतर साहित्य वापरून रस्त्याचा भराव करण्यात आला. पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी १२ मीटर रुंदीचा कल्व्हर्ट तयार करण्यात आला. या कामासाठी तीन पोकलेन, चार एक्स्कॅव्हेटर्स, ४० हून अधिक डंपर, आठ काँक्रीट मिक्सर्स आणि मोठ्या मनुष्यबळाचा वापर करण्यात आला. सुमारे ५०० ट्रक खडी व ॲग्रीगेटचा वापर करून रस्ता पूर्ववत करण्यात आला.
दरम्यान, चिखले–नावखाडी रस्त्यावरील भरावही पुरामुळे वाहून गेला होता. साहित्य उपलब्धतेच्या अडचणींवर मात करत सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक साहित्य मिळवून दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आणले असून हा रस्ताही लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्कालीन परिस्थितीत पायाभूत सुविधा जलद गतीने पूर्ववत करण्यासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी सांगितले.